
रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जवळील बोरघर येथील जंगलमय भागात रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोघांना ताब्यात घेत वनविभागाच्या स्वाधीन केले. शिकारीसाठी फासकीचा वापर केल्याचे वनविभागाच्या तपासात समोर आले आहे. काही प्रमाणात रानडुकराचे मांसही जप्त केल्याचे समजते.अजित नारायण कदम (रा.बोरघर-घोलपवाडी) आणि आकाश बाळकृष्ण पवार (रा. बोरघर-आदिवासीवाडी) अशी रानडुकराची शिकार केलेल्या संशयितांची नावे आहेत.
या दोघांनी रानडुकराची शिकार केल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल ए. बी. शेख यांनी घटनास्थळ गाठत दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता रानडुकराची शिकार केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानुसार दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे आदींच्या पथकाने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.डुकराची शिकार करून ज्या ठिकाणी मांस कापले गेले त्या ठिकाणाचा पंचनामा करत काही प्रमाणात मांस वनविभागाने हस्तगत केल्याचे समजते