
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या मार्गावर पत्रकारांनी चालावे – नितेश राणे
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम – बाळशास्त्री जांभेकर यांनी रचलेल्या पत्रकारितेच्या मार्गावरून सर्व पत्रकारांनी चालावे. लोकप्रतिनिधी म्हणून आमचे एवढीच अपेक्षा आहे की , पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांनी एकमेकाला पूरक आणि पोषक काम करायला हवे यामुळे समाज घडवण्यामध्ये , महाराष्ट्र घडवण्यामध्ये आणि धर्माला टिकवण्यामध्ये फार मोठी मदत होऊ शकते. याचा विचार सर्वच पत्रकारांनी करावा ही अपेक्षा आहे, असे मत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म गावी बोलत होते .आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज पोंभुर्ले गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमेची पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. बाळशास्त्री जांभेकर यांच्या वंशजानी उपस्थितांसमोर लाठीकाठी , दानपट्टा इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. – पोंभूर्ले गावामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे उभारले जाणारे स्मारक पत्रकारितेचे अभ्यास केंद्र ठरेल असा विश्वास नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, देवगड तहसीलदार आर जे पवार, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पत्रकार आणि ग्रामस्थ हजर होते.