
रत्नागिरी शहराजवळील निसर्ग वादळात किनाऱ्यावर अडकलेले सुमारे ३५ काेटींचे बसारा जहाज दाेन काेटींमध्ये भंगारात काढले जाणार.
शहरातील मिऱ्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तब्बल पाच वर्षांनंतर हे जहाज काढण्यात येणार असून, सुमारे ३५ काेटींचे हे जहाज दाेन काेटींमध्ये भंगारात काढले जाणार आहे.याबाबत एम. एम. शिपिंग काॅर्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर सीमाशुल्क, मेरिटाईम बोर्डाशी पत्रव्यहार करत आहेत. ५०० मेट्रिक टन वजनाचे हे जहाज १५ दिवसांत परवानगी मिळाल्यावर भंगारात काढले जाणार आहे.बसरा स्टार जहाजामुळे मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम रखडले आहे. त्यामुळे पतन विभागाने याबाबत मेरिटाईम बोर्ड आणि कस्टम विभागाला जहाज काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्याला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली. त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे.
दुबईहून हे जहाज मालदीपला जात असताना ३ जून २०२० राेजी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने मिऱ्या किनारी अडकून पडले आहे. या जहाजामध्ये १३ क्रुजर होते. मेरीटाईम बोर्ड, पोलिस, तटरक्षक दल, आदींच्या मदतीने रेस्क्यू करून १३ जणांचा जीव वाचविण्यात यंत्रणेला यश आले.हे जहाज काढण्याबाबत दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून, त्यांनी ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे.