![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/02/download-5-5.jpeg)
प्लास्टीक मुक्तीसाठी ८४६ ग्रामपंचायतीत महाश्रमदान* जिल्हा परिषदेच्यावतीने स्वच्छता मोहीम
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्या नियोजनानुसार शंभर दिवस उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामधील ८४६ ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टीक मुक्त महाश्रमदान स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. सर्व तालुक्यातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, वर्दळ असणारी ठिकाणे, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग या ठिकाणी काल (ता. १५) स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने शंभर दिवस वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामध्ये स्वच्छता हा एक भाग आहे.
दैनंदिन जीवनात प्लास्टीकचा वापर वाढता आहे. त्यामुळेठिकठिकाणी प्लास्टीक कचरा मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागापासून शहरांमध्ये त्याचे प्रमाण वाढलेले आहे. हा कचरा गोळा करून प्लास्टीकची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हापरिषदेने महाश्रमदान मोहिम प्रत्येक ग्रामपंचायतीत राबविली आहे. त्यामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी, महिला मंडळ, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटाच्या महिला तसेच शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले.
मिरजोळे, कुवारबाव व खेडशी ग्रामपंचायतीत मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी हजेरी लावली. त्यांनी हातामध्ये खराटा घेऊन स्वच्छताही केली. त्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गट विकास अधिकारी जे.पी.जाधव सहभागी झाले होते. या मोहीमेमध्ये सहभागी नागरीक, विद्यार्थ्यांना स्वच्छता साहित्य दिले गेले होते.