‘केसरी टूर्स’चे संस्थापक अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे निधन!

मुंबई : ‘पर्यटक देवो भव:’ या संकल्पनेतून स्थापना झालेल्या केसरी टूर्सचे संस्थापक व अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, दोन मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. केसरीभाऊ पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वांद्रे येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. यावेळी राजकीय, सामाजिक, पर्यटन आदी विविध क्षेत्रांतील मंडळींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील मथाने गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात केसरीभाऊ पाटील यांचा १९३५ साली जन्म झाला. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर मध्यमवर्गीयांचे माफक दरात जग फिरण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या ५० व्या वर्षी १९८४ साली त्यांनी ‘केसरी टूर्स’ची स्थापना केली आणि मुंबईत कुटुंबासह स्थायिक झाले. केसरी टूर्सचे पहिले कार्यालय त्यांनी दादर – माहीम परिसरात सुरू केले. त्यानंतर या कंपनीचा विस्तार करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि पर्यटनक्षेत्रातील सर्वोत्तम कंपनी म्हणून’केसरी टूर्स’ला नावलौकिक मिळवून दिला.

केसरी टूर्स’ने नेहमीच पर्यटकांना उत्तमोत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. पर्यटकांचे प्रेम आणि विश्वास यावरच ‘केसरी टूर्स’ची यशस्वी वाटचाल सुरू आहे, असे ते नेहमी म्हणायचे.आजघडीला ‘केसरी टूर्स’च्या राज्यासह देशभर आणि जगभर अनेक शाखा आहेत. केसरी टूर्सच्या माध्यमातून राज्यांतर्गत, देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय सहलींचे आयोजन केले जाते. पर्यटन क्षेत्रातील अनमोल योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना पर्यटन क्षेत्रातील चालते – बोलते विद्यापीठ म्हणून संबोधले जायचे. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रांसह पर्यटन क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button