
हिंदुत्ववादी विचारांनी पक्ष संघटना मजबुत करूया, मंत्री नितेश राणे.
रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री झाल्यानंतर मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भाजप जिल्हा कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ देणे आणि रत्नागिरीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविण्यासाठी माझ्यावर संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मी हिंदुत्ववादी आहे. हिंदू समाज माझ्यासाठी केंद्रबिंदू आहे. त्यामुळे पक्षाचे काम करताना हिंदू समाजाला संरक्षण देणे हेही माझं काम आहे. हिंदुत्ववादी विचारांची जोड देत संघटन भक्कम करूया, असे आवाहन राणे यांनी केले.
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि आता इथला संपर्क मंत्रीही भाजपचाच आहे. त्यामुळे प्रशासनात जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर तुम्ही नक्की मला सांगा. माझ्यावर दबाव टाकणारा इथे कोणी नाही. खासदार म्हणून नारायण राणे येथे कार्यरत आहेत. पक्ष ताकदीने वाढला पाहिजे यासाठी प्रत्येक आठवड्यात या जिल्ह्यात येणार, कार्यालयात बसून कार्यकर्त्यांचे म्हणणं ऐकून घेणार, जिल्हा नियोजन समितीमध्ये आपली माणसं कशी दिसतील, यासाठी आग्रह धरणार आहे.
ज्या परिस्थितीत तुम्ही काम करता ते बघता तुमचं कौतुक केलंच पाहिजे. मात्र आता पक्षाने बळ दिल्यावर जोमाने कामाला लागा. सभासद नोंदणीकडे लक्ष द्या. जिल्हा परिषद गटनिहाय दौरा आपण करू. जिथे आपले सरपंच आहे. तिथे त्यांना निधी देऊ, येणारा काळ हा शत-प्रतिशत भाजपचा काळ आहे. आपल्याला स्वतःच्या ताकदीने उभं रहायचं आहे.www.konkantoday.com