
पक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे : ना. उदय सामंत
रत्नागिरी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका सुरुवातीपासूनच पक्षाला कळली नाही, पक्षप्रमुखांपयर्र्त ती पोहोचली नाही. ती भूमिका मांडणं आवश्यक आहे असं मला वाटतं. माझी भूमिका मी शिवसेना पक्षाच्या बैठकीमध्ये मांडलेली आहे. पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर मला वाटतं की कुठंतरी सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे, जे आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे असे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी सांगितले. आमच्या लोकांमध्ये जे गैरसमज असतील ते दूर झाले पाहिजेत. या सगळ्या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, असे ना. सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय धुमशान सुरू असताना शुक्रवारी रत्नागिरीचे आमदार व राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे पाली येथील निवासस्थानी आले. गेले तीन-चार दिवस पक्षाच्या विविध बैठकांना ते उपस्थित होते. ना. सामंत घरी आल्याचे समजल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांच्या निवासस्थानी रीघ लावली होती. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.