माऊली- बालाजी ग्रूप देवरूख यांच्या वतीने रविवार दिनांक १७ मार्च रोजी राज्यस्तरीय बैलगाडा गटांच्या शर्यतीचे आयोजन

_माऊली- बालाजी ग्रूप देवरूख यांच्या वतीने रविवार दिनांक १७ मार्च रोजी राज्यस्तरीय बैलगाडा गटांच्या शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यती साडवली येथे पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल समोर भव्य धावपट्टी वर खेळवण्यात येणार आहेत. सकाळी ठिक ९ वाजता स्पर्धा सुरू होतील. एकाच वेळी पाच बैलगाड्या पळविण्यात येतील यामुळे तालुक्यातील बैलगाड्या शर्यतप्रेमींसाठी ही स्पर्धा आगळीवेगळी मेजवानी ठरणार आहे. प्रथम विजेत्या बैलगाडा मालकास रोख रक्कम ५१ हजार आणि चांदीची गदा, उपविजेता क्रमांकासाठी ३१ हजार आणि चषक, तृतीय क्रमांकासाठी २१ हजार आणि चषक, चौथ्या क्रमांकासाठी ११ हजार आणि चषक तर पाचव्या क्रमांकासाठी ७ हजार आणि चषक अशी भरघोस पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तर सहभागी सर्व बैलगाडा मालकास सन्मानचिन्ह देण्यात येईल.राज्यस्तरावरील शंभर हून अधिक बैलगाड्या यावेळी सहभागी होतील असा माऊली बालाजी ग्रूपचा अंदाज आहे. देवरूख येथील उद्योजक प्रसन्न सार्दळ यांच्या नेतृत्वाखाली सुमारे वीसहून अधिक वर्षे माऊली बालाजी ग्रूप कार्यरत आहे. देवरूख आणि परिसरातील तब्बल साठाहून अधिक सभासद यामध्ये सक्रीय आहेत. दरवर्षी तिरूपती बालाजी आणि माऊलींच्या दर्शनासाठी सामुदायिक सहलीचे आयोजन करण्यात येते. यामध्ये युवकांपासुन सेवानिवृत्त वयोगटातील सदस्य उत्साहाने सहभागी होत असतात. तसेच सदस्यांना आर्थिक बचतीची सवय व्हावी यासाठी मासिक भिशी आणि फंड ग्रुपच्या वतीने चालविण्यात येते. स्पर्धेसाठी उद्योजक श्री किरण सामंत,खासदार श्री विनायक राऊत,आमदार श्री शेखर निकम, वाशिष्ठी दुध संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांत यादव, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री विलास चाळके, श्री सुरेश बने, माजी आमदार श्री सुभाष बने, श्री रवींद्र माने, श्री रोहन बने आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. बैलगाडा शर्यतीच्या नियोजनासाठी श्री प्रसन्न सार्दळ यांच्या नेतृत्वाखाली श्री राजू जाधव, श्री संजय नाखरेकर, उमेश देसाई, बापू डोंगरे, नंदन डोंगरे आणि ग्रुपचे सदस्य विशेष प्रयत्न करीत आहेत.,www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button