
नगर परिषदेचा अजब कारभार, पाईप लाईन दुरूस्तीसाठी कॉंक्रीट रस्त्याखाली मातीची खोदाई.
रत्नागिरी शहरातील नवीन नळपाणी योजनेच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी शहरातील माळनाका पुढारी भवनजवळ खोदाई करण्यात आली असून खोदाई करताना कॉंक्रीटीकरण केलेल्या रस्त्याच्या खालून माती काढल्यामुळे भविष्यात कॉंक्रीटचा रस्ता खचण्याची शक्यता वाहनचालकांमधून व्यक्त होवू लागली आहे.
शहरात सध्या कॉंक्रीटच्या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. हा रस्ता होण्यापूर्वी नवीन जलवाहिनी आणि केबलींगचे काम खोदाई करून करण्यात आले होते. जलवाहिनीला मध्यंतरी वारंवार गळती लागत होती. सध्या गळतीचे प्रमाण कमी असले तरी अधूनमधून गळतीचे प्रकार होत आहेत.
गुरूवारी शहरातील माळनाका येथील पुढारी भवजनजवळ कॉंक्रीटच्या रस्त्याच्या बाजूने डांबरीकरण केलेल्या ठिकाणी खोदाई करून पाईपलाईनचा तुकडा बदलण्यात आला. परंतु ही जलवाहिनी कॉंक्रीटीकरणाच्या खालून जात असल्याने एका बाजूने खोदाई करून कॉंक्रीटीकरणाच्या खाली मोठा खड्डा खणण्यात आला आणि जलवाहिनीची दुरूस्ती करण्यात आली. परंतु काम झाल्यानंतर खड्डा ठेकेदाराकडून भरण्यातही येईल. परंतु त्या ठिकाणी टाकण्यात आलेली माती वाहनाच्या येण्याजाण्यामुळे दबली जावून, त्याबरोबर कॉंक्रीटचा भागही खाली जाण्याची शक्यता वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.www.konkantoday.com