
राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, चांगली बसायला…’; फडणवीस भेटीवरुन राऊतांचा खोचक टोला
एकीकडे राज ठाकरेंनी भाजपाबरोबरच्या मित्र पक्षावर निशाणा साधलेला असतानाच दुसरीकडे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला थेट त्यांच्या घरी गेले आहेत. या भेटीसंदर्भात वेगवेगळे तर्क मांडले जात असतानाच राऊत यांनाही ही भेट सुरु असतानाच प्रश्न विचारण्यात आला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. विधानसभामध्ये त्यांना सोबत घेण्याची भूमिका होती पण ते आले नाहीत. आता त्यांची टीका आणि ही भेट याकडे तुम्ही कसे बघता?” असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना विचारला.या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊतांनी, “मी काय बघणार? त्यात बघण्यासारखं काय आहे. राज ठाकरेंनी शिवाजीपार्कला कॅफे खोलेला आहे ऐवढंच मला माहिती आहे. तिथे लोक सातत्याने चहापाण्याला येत असतात. तो सगळ्यांसाठी खुला आहे. चांगली गोष्ट आहे. राजकारणात असं चहापान होत असतं. चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांना समोर नजारा पाहायला मिळतो. चांगली बसायला जागा मिळते उत्तम,” असं उत्तर दिलं.