
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचा 22 फेब्रुवारी रोजी मासिक स्नेह मेळावा “गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ” संकल्पना राबविण्यासाठी विशेष मोहीम राबविणार
रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता कुवारबाव येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात संपन्न होणार आहे. या मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणातील तरतुदींचा ज्येष्ठांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ म्हणजेच फेसकॉम तर्फे राज्यभरात “गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ” ही संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी ज्येष्ठांना संघटित करून प्रत्येक मध्यवर्ती गावात अथवा पंचक्रोशीत ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन किमान ५० ज्येष्ठांना संघटित केल्यास त्यांना संघ स्थापनेच्या दृष्टीने त्या गावात जाऊन आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल.
यासाठी संबंधितांनी पुढाकार घेऊन कुवारबाव संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांच्याशी मोबाईल क्रमांक 9421187713 अथवा 9763297369 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मासिक स्नेह मेळाव्याला ज्येष्ठ नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. यावेळी फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र शंकरराव कदम यांनी दिली आहे.