गुरु-शिष्य परंपरेला बाधा येता कामा नये शिक्षकांवरचा विश्वास अबाधित राहिला पाहिजे – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, :- विद्यार्थी हे पालकांपेक्षाही शिक्षकांचे जास्त ऐकत असतात त्यामुळे गुरु-शिष्य परंपरेला बाधा येता कामा नये. समाजाचा, विद्यार्थ्यांचा शिक्षकांवरचा विश्वास अबाधित राहिला पाहिजे, असे मार्गदर्शन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग योजना आयोजित जिल्हास्तरीय ‘उल्लास’ मेळाव्याचे उद्घाटन येथील मिस्त्री हायस्कूलमध्ये पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, डायएटचे प्राचार्य डॉ. सुशील शिवलकर, मुख्याध्यापक जुबेर गडकरी, राहुल पंडित, शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार, जेष्ठ पत्रकार अलिमियाँ काझी, विश्वस्त शकील मजगावकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षकांनी भरीव कामगिरी केली आहे. कोकण बोर्ड अस्तित्वात आल्यापासून प्रथम क्रमांकावर आहे. यात शिक्षकांचे योगदान मोठे आहे. शिक्षण पध्दतीवर मतमतांतरे असू शकतात. परंतु, सृष्टी टिकली पाहिजे, असे पर्यावरणावर आधारित शिक्षणाचा समावेश भविष्यात हवा. शिक्षकांनी शिक्षकांचे काम केले पाहिजे, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे काम करायला हवे. डॉ. कलामांसारखा आदर्श विद्यार्थी घडवायचा असेल तर, नाक्यावर राजकारणापेक्षा शिक्षणावर चर्चा झाली पाहिजे. मोबाईल वापर चांगला की वाईट ही ठरविण्याची आणि प्रबोधन करण्याची वेळ आज आली आहे. नासा आणि इस्रोने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाठविण्याची या जिल्ह्याची संकल्पना राज्यातील अनेक जिल्ह्यांनी उचलून धरली आहे. याचे श्रेय जिल्हा परिषद आणि शिक्षकांना जाते. शिक्षक संघटनेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे. परंतु, राजकारणापेक्षा विधायक चर्चा शिक्षकांनी शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांबाबत करायला हवी, असेही डॉ. सामंत म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. येथील स्टॉलचेही फित कापून पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button