राजधानी दिल्लीत मतदानाला सुरुवात; तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
राजधानी दिल्लीत आज विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होणार आहे. सत्तारुढ आप पक्ष आणि विरोधी बाकावरचे काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत येथे पाहायला मिळणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून आरोप प्रत्यारोप करत वादळी प्रचार झाला. राजधानीत एकूण एक कोटी ५६ लाख मतदार आहेत. मतटक्का वाढविण्यासाठी विविध व्यावसायिकांनी सवलती जाहीर केल्या आहेत.
मतटक्का वाढवण्याचे प्रयत्न
८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. मतदान किती होते त्यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. मतदानानंतर सलून तसेच ब्युटी पार्लरमध्ये २० ते ५० टक्के सवलत उद्योग व व्यापार संघटनेने (सीटीआय)जाहीर केली. पाचशे दुकानदारांनी या योजनेत सहभाग घेतल्याचे संघटनेने जाहीर केले. मतटक्का वाढावा यासाठी या योजना असल्याचे चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे(सीटीआय) अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी सांगितले. हॉटेल तसेच मॉलमध्येही मतदान केल्यावर १० ते ५० टक्के सवलत मिळेल.
- एकूण जागा ७०
- मतदार १ कोटी ५६ लाख
- मतदान केंद्र १३ हजार ७६६
- एकूण उमेदवार ६९९
- मतदान सकाळी सात ते सायंकाळी सहा