दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती!
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षार्थ्यांना समुपदेशकांकडून ताणतणाव व्यवस्थापनाबाबत मोफत मार्गदर्शन घेता येणार आहे.
राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात करण्यात आली आहे.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ९०११३०२९९७, ९९६०६४४४११, ८२६३८७६८९६, ७२०८७७५११५, ८३२९२३००२२, ९५५२९८२११५, ९८३४०८४५९३ या क्रमांकावर परीक्षेपूर्वी, तसेच परीक्षेच्या कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिकेसंबंधित समुपदेशकांना विचारणा करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.