
विकासकामांचा निधी न आल्यास जिल्हा नियोजनला बसणार फटका?
जिल्हा नियोजन मंडळाची आढावा बैठक २ फेब्रुवारी रोजी होत आहे. सन २०२४-२५ च्या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेल्या ३६० कोटींच्या आराखड्यापैकी फक्त १९४ कोटी रुपयेच अद्यापपर्यंत जिल्हा नियोजनला प्राप्त झाले आहे. नियोजनमध्ये मंजूर झालेली अनेक विकास कामे सुरू असून उर्वरित निधी न आल्यास निधीअभावी विकास कामेही ठप्प होण्याची चिन्हे असून ठेकेदारही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा फटका जिल्हा नियोजनला बसण्याची शक्यताही आता वर्तविली जात आहे.
रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाचा सन २०२४-२५ च्या ३६० कोटींच्या आर्थिक आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली होती. आराखड्यानुसार मंजूर झालेली कामे त्यानंतर निविदा प्रक्रिया होवून सुरूवातही झाली. या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये १९४ कोटींचा निधी जिल्हा नियोजनला प्राप्त झाला होता. त्यानंतर विधान सभा निवडणुका जाहीर होवून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा उदय सामंत यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
नव्या मंत्रिमंडळात उद्योग खाते आणि रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ना. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनची आढावा बैठक रविवार २ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजनच्या सभागृहात आयोजित केली आहे. www.konkantoday.com