
सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात…’; तृप्ती देसाईंचा ड्रेसकोडला विरोध.
मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. ड्रेसकोडनुसार कपडे परिधान केलेले नसतील तर मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश नाकारला जाईल असं सांगण्यात आलं आहे.सिद्धीविनायक मंदिर न्यासकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मात्र या नियमावरुन आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यासकडून लागू करण्यात आलेल्या या नियमाला सामाजिक कार्यकर्त्या तसेच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी विरोध केला आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यासाने ड्रेसकोडसंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावे, असे न्यासकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजेत अशीही सूचना या पत्रकामध्ये देण्यात आली आहे. असे कपडे परिधान करुन येणाऱ्या भाविकांनाच सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.मात्र या नियमाला तृप्ती देसाईंनी विरोध केला आहे. “सिद्धिविनायक मंदिरात आज ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मात्र हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा,” अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
“संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. जो कोणी मंदिरात येतो तो श्रद्धेने येत असतो. त्याचे कपडे न पाहता त्याची श्रद्धा पाहिली पाहिजे,” असं तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे. “सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात आहेत. मग हा निर्णय मग फक्त भक्तांनाच लागू आहे का?” असा सवाल तृप्ती देसाईंनी उपस्थित केला आहे. “नियम करायचे असतील तर सगळ्यांसाठी करा,” असं तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे.