आर्ट सर्कल रत्नागिरीच्या वतीने दरवर्षी साकारणारा शास्त्रीय संगीत महोत्सव शुक्रवार पासून (दिनांक 24 ) सुरू.

संगीत रसिकांना मेजवानी देणारा आर्ट सर्कल आयोजित संगीत महोत्सव दिनांक २४ पासून थिबा राजवाडा परिसरात रंगणार आहे. बंगलोरचे सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ बेलामनु महोत्सवाचा प्रारंभ करणार आहेत. प्रारंभी कर्नाटक शास्त्रीय संगीत आणि त्यानंतर गुरू पी. आर. मंजूनाथ यांच्याकडे उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे घेत सिद्धार्थ यांनी आपल्या गाण्याला आकार दिला. ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे अध्वर्यू पं. विनायक तोरवेजींकडे गेली आठ वर्षं गुरुकुल पद्धतीने शिकत सिद्धार्थ पुढील प्रगती करत आहेत.

रत्नागिरीचा वरद सोहनी सिद्धार्थ यांना संवादिनी साथ करणार आहे, तर प्रणव गुरव तबला साथ करणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी रात्री साडे आठ वाजता संतूर वादक डॉ. शंतनु गोखले पहिल्या दिवसाचा समारोप करतील. कोवळ्या वयात तबला आणि संवादिनीचे मार्गदर्शन घेण्यास सुरूवात केली आणि कळत्या वयात मात्र त्यांना भुरळ घातली ती संतूर या वाद्याने. पं शिवकुमार शर्मा यांचेकडे शिकण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांना तबला साथ लाभणार आहे, रामदास पळसुले यांची! दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.०० सुप्रसिद्ध युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर आणि बासरीवादक एस. आकाश आपल्या सहवादनाने प्रारंभ करतील.

वडील जगप्रसिद्ध व्हायोलिन स्वरप्राज्ञ पं. वादक मिलिंद रायकर यांच्याकडून व्हायोलिनचे तर गानसरस्वती किशोरी आमोणकर , आनंद पेडणेकर आणि कै. पं. वसंतराव कडणेकर यांच्याकडून कंठसंगीताचेही धडे त्यांनी घेतले आहेत. या तंतूवाद्यासोबत सहवादन आहे सुषीर वाद्य बासरीचे! संकेथी घराण्यात जन्मलेले बासरी वादक एस. आकाश यांच्यासोबत हे सहावादन रंगणार आहे. वयाच्या चौथ्या वर्षी सुप्रसिद्ध बासरीवादक पं व्यंकटेश गोडखिंडी यांच्याकडे बासरीचे धडे गिरवायला त्यांनी सुरूवात केली. पं. रोणू मुझुमदार यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांचे वादन अधिकाधिक बहरत गेले आहे.

या सहवादनाला पखवाजसाथ करणार आहेत रत्नागिरीचे गुणी वादक प्रथमेश तारळकर. तालयोगी पं सुरेश तळवलकर यांच्या तालमीत तयार होत प्रथमेश यांनी अल्पावधीतच स्वतःचे भक्कम स्थान संगीत जगतामध्ये निर्माण केले आहे. या सहवादनाला तबला साथ करणार आहेत, विवेक पंड्या. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाचा समारोप करतील, बंगलोरच्या शास्त्रीय गायिका विदुषी भारती प्रताप. आग्रा घराण्याच्या भारती प्रताप आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. गुरु श्री. मारुतीराव इनामदार, पं. रामाराव व्ही. नाईक यांच्याकडे मार्गदर्शन घेतल्यावर गेला काही काळ आग्रा घराण्याच्या अध्वर्यू विदुषी ललित जे. यांच्याकडे शिक्षण सुरू आहे.

विदुषी भारती यांना पं. अजय जोगळेकर संवादिनी साथ तर बेंगलोरचे योगीश भट तबला साथ करणार आहेत. उस्ताद अल्लारखाँ यांचे शिष्य आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे गुरू बंधू असलेले पं योगेश समसी यांच्या तबला सोलोने शेवटच्या दिवसाची सुरुवात होणार आहे. वडील पं. दिनकर कैकिणी यांच्याकडून वयाच्या चौथ्या वर्षीपासून तबल्याचे धडे घ्यायला त्यांनी सुरूवात केली. पं एच. तारानाथ राव यांच्याकडून पुढील धडे घेतल्यानंतर साक्षात ताल मानले जाणारे उस्ताद अल्लारखाँ यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्यावर प्रभुत्व मिळवायला सुरूवात केली. उत्तम संगतकार आणि उत्तम एकल वादक असा दुर्मिळ संयोग संगीत महोत्सवात योगेशजींच्या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत पुण्याचे मिलिंद कुलकर्णी संवादिनीवर लेहरासाथ करणार आहेत.

महोत्सवाचा समारोप करणार आहेत, हुबळीचे सुप्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेऊंडी. एक दशकाहून अधिक काळ त्यांनी पं अर्जुनसा नाकोद यांच्याकडे गाण्याची तालीम घेतली. त्यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशींचे शिष्य पं. श्रीपती पडिगर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीची आठवण करून देणार्‍या गायकीने महोत्सवाचा हृद्य समारोप होणार आहे. त्यांना यशवंत वैष्णव तबला साथ तर अजय जोगळेकर संवादिनीसाथ करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे याही महोत्सवाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन आर्ट सर्कल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button