
पर्यावरणपूरक, रोजगार देणाऱ्या प्रकल्पाचे समर्थन करुया – उद्योग मंत्री उदय सामंत
रत्नागिरी, : पर्यावरणपूरक आपल्या हजारो मुलांना रोजगार देणारा प्रकल्प आपल्या परिसरामध्ये येणार असेल तर, भविष्यात त्याचे आपण समर्थन करु, असा संकल्प सर्वांनी करुया, असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
जि. प. आदर्श प्राथमिक शाळा सत्कोंडी नूतन इमारतीचे उद्घाटन उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.एम. कासार, तहसिलदार राजाराम म्हात्रे, सरपंच सतीश थुळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन ऊर्फ आबा पाटील, माजी सभापती ऋतुजा जाधव, सत्कोंडी शाळेचे पहिले विद्यार्थी भाई जोग, शाळा समिती अध्यक्ष अरुण मोरे, प्रकाश साळवी, बाबू पाटील, संजना माने, मेघना पाष्टे, जांभारीचे सरपंच आदेश पावरी, सैतवडेचे सरपंच साजीद शेखासन, वाटदचे सरपंच अमित वाडकर आदी उपस्थित होते.
उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, शाळा कशा पध्दतीने ठेवली पाहिजे, जोपासली गेली पाहिजे, हे महाराष्ट्रात कोठे बघायचे असेल तर, सत्कोंडीमध्ये यावे लागेल. इमारती, कार्यालये उभे राहतात परंतु, आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने त्यामधील शौचालये देखील स्वच्छ असणे गरजेच आहे. भविष्याचा विचार सत्कोंडी गावाने केलेला आहे. भविष्यात कोणत्या शैक्षणिक सुविधा असल्या पाहिजेत, त्यासाठी वाचनालय, अभ्यासिका, चांगली कार्यालये असणे गरजेचे आहे, अशी भूमिका या गावामध्ये घेतली गेलेली आहे. सत्कोंडी ग्रामस्थांच्या योगदानातून ज्या पध्दतीने येथील इमारती उभ्या राहिल्यात, तशा प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये जर इमारती उभ्या राहिल्या तर प्रत्येक गावामध्ये पर्यावरणपूरक वातावरण असेल.
येथे आल्यानंतर अतिशय सुंदर शाळा आणि स्वच्छ शौचालये आहेत. सत्कोंडी गावाने आदर्शवत असे काम केलेले आहे. येथील कंपाऊंड वॉल बांधणे, अंगणवाडी इमारत उभारणे, इमारतींना कलरींग करणे यासाठी निधी मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
या शाळेतील माजी विद्यार्थी, माजी शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळा इमारतीच्या उद्घाटनाआधी उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते अनंतराव बैकर बहुउद्देशीय संकुल या फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संजय बैकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.