विकासकामांना कात्री पणलाडक्या बहिणींना २१०० रुपये; हसन मुश्रीफ यांची ग्वाही!

कोल्हापूर : विकासकामांना कात्री लावू पण लाडकी बहीण योजना हमखासपणे राबवू. विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात घोषित केल्याप्रमाणे यापुढे दरमहा महिलांना २१०० रुपये देण्यात येतील. त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणतील, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

गोकुळ दूध संघाच्या वतीने आज मंत्री मुश्रीफ, आरोग्य मत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांचा सत्कार अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अजित नरके यांनी केला. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील होते. त्यांचा सत्कार संचालक अमर पाटील यांनी केला, यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महायुती – महाविकास आघाडीचे नेते एकत्र आल्याने कोण काय बोलणार, याचे कुतूहल होते. यावेळी लाडकी बहीण योजनेवरून सतेज पाटील यांनी टोलेबाजी केली होती. हाच मुद्दा घेऊन गोकुळच्या सत्तेत असलेले मंत्री मुश्रीफ यांनी त्यांचे मित्र सतेज पाटील यांना प्रतिटोला देण्याची संधी सोडली नाही.

ते म्हणाले, की विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित करून साडेसात हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केले. त्याचा परिणाम काय झाला ते सतेज पाटील यांना पक्के कळून चुकले आहे. महिलांनी नवऱ्याकडे पैसे मागायचे बंद केले. बाजारात त्यांची गर्दी वाढली. लाडक्या बहिणींनी भरभरून मते दिल्याने महायुतीचे शासन आले. आता शासन महिलांना २१०० रुपये देणार आहे. याच महिला महापालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीची सत्ता आणतील, याचा विश्वास आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button