सिंधुदुर्गातील राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचे भासवून, वैद्यकीय प्रवेशासाठी ४५ लाखांची फसणूक!

मुंबई : सिंधुदुर्गातील महाविद्यालयाचे विश्वस्त असल्याचा दावा करून महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी चौघांना अटक केली असून आरोपींनी विश्वास संपादन करण्यासाठी स्वतःला सिंधुदुर्गातील मोठ्या नेत्याचे नातेवाईक असल्याचे भासवले होते.

अंधेरी येथील ५१ वर्षीय पीडित महिला खासगी रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करतात. त्यांच्या मुलीने ऑक्टोबर २०२० मध्ये नीट परीक्षेत ३१५ गुण मिळवले होते. ती सध्या बंगळुरूमध्ये बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तक्रारीनुसार, मार्च २०२१ मध्ये मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी प्रयत्न करत असताना तक्रारदार महिलेची भेट तिची जुनी मैत्रिणी मेघना सातपुते हिच्याशी झाली. सातपुतेने तक्रारदार महिलेला आणि तिच्या मुलीला तिच्या परिचीत व्यक्तींच्या मदतीने प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर १४ मार्च २०२१ रोजी सातपुतेने वर्सोव्याच्या सात बंगला येथील एका हॉटेलमध्ये तक्रारदार महिलेची भेट घेतली.

तेथे ती स्वतः आणि नितेश पवार व राकेश गवडे हे सिंधुदुर्गातील एका वैद्यकीय महाविद्यालयाचे विश्वस्त असल्याचे सांगितले. त्यांनी तक्रारदार महिलेच्या मुलीला व्यवस्थापन कोट्यातून महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली.ती रक्कम देण्यासाठी तक्रारदार महिला तयार झाली. पण त्यानंतरही तक्रारदार महिलेच्या मुलीला प्रवेश मिळाली नाही.

करोनामुळे टाळेबंदी असताना सर्व नियम बदल्यामुळे प्रवेशासाठी आता लाख रुपये लागतील, असे आरोपींनी सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सातपुते व पवार यांनी तक्रारदार महिलेला सावंत काकांची ओळख करून दिली. त्यांनी स्वतःला सिंधुदुर्गातील एका मोठ्या नेत्याचे जवळचे नातेवाईक व विश्वस्त असल्याचे सांगितले.आरोपींनी तक्रारदार महिलेला गुणवत्ता यादी दाखवून त्यांच्या मुलीचा प्रवेश निश्चित असल्याचेही सांगितले.

त्यानंतर तक्रारदार महिलेने पैसे जमवून इलेक्ट्रॉनिक बँक व्यवहार आणि रोख स्वरूपात दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत आरोपींना एकूण ४५ लाख रुपये दिले. डिसेंबर २०२१ मध्ये महाविद्यालय सुरू होईल. मात्र, त्यांनी कोणतेही कागदपत्रे किंवा प्रवेश पत्र दिले नाहीत. म्हणून तक्रारदार महिलेला संशय आला आणि तिने वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्या मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसल्याचे समजले. त्यावेळेपासून तक्रारदार महिला आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती.

मात्र सर्वांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. वर्सोवा पोलिसांनी मेघना सातपुते, नितेश पवार, राकेश गवडे आणि सावंत काका नावाच्या व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button