जेसीबी चालवून दुकान जमीनदोस्त केल्याच्या गुन्ह्यातून तिघांची निर्दोष मुक्तता.
गुहागर कोतळुक बौद्धवाडी येथे जेसीबी लावून दुकान पाडल्याच्या गुन्ह्यातून तिघांची गुहागर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. कोतळुक येथील संदीप तुकाराम मोहिते यांच्या मालकीचे भीम उपकार जनरल स्टोअर्स हे दुकान त्यांचेच नातेवाईकांकडून पाडण्यात आले होते.
कोतळुक बौद्धवाडी येथे दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास संदीप तुकाराम मोहिते यांच्या मालकीचे भीम उपकार जनरल स्टोअर्स हे दुकान त्यांचेच नातेवाईक असलेल्या सुगंनदास बुधाची मोहिते व त्यांचे दोन मुलगे गीतेश सुगंनदास मोहिते आणि प्रवीण सुगंनदास मोहिते यांनी जेसीबी चालवून जमीनदोस्त केल्याप्रकरणी गुहागर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. गुहागर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून या तीनही संशयित आरोपी यांचे विरुद्ध गुहागर न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते. सदरचा खटला गुहागर न्यायालयामध्ये तीन वर्षे चालला. या केसच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यामध्ये जेसीबी चालक नारायण राठोड याची देखील महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली गेली होती.
या संपूर्ण केसच्या कामकाजांमध्ये आरोपी यांचे वतीने ॲड. संकेत साळवी यांनी केस चालवली. सरकारी पक्षाच्या आठही साक्षीदारांच्या उलट तपासणी मध्ये आवश्यक त्या तफावती आणून साक्षीदारांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आरोपीच्या वकीलांना यश मिळाले.
सदर केसच्या अंतिम युक्तीवाताचे वेळी, सरकारी पक्षाने सादर केले पुरावे हे पुरेसे नाहीत, आवश्यक त्या गोष्टी शक्य असून सुद्धा सरकारी पक्ष मांडू शकला नाही. जागेचा मालकी हक्क हा आरोपींचाच आहे आणि मुळातच त्या जमिनीवर दुकान अस्तित्वात होतं किंवा नाही ही गोष्ट सुद्धा सरकारी पक्ष समोर आणू शकला नाही’ असा सविस्तर युक्तीवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला. ॲड. संकेत साळवी यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य मानुन शुक्रवारी गुहागर न्यायालयाने या तीनही आरोपींची सदर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली