सत्ताधीशांनी जिल्हा प्रशासनाला तालावर डोलणारे बाहुले बनवून जनतेला वेठीस धरले आहे – ॲड. दीपक पटवर्धन

अंत पाहू नका भा.ज.पा. आता रस्त्यावर उतरेल

रत्नागिरीमध्ये कडक लॉकडाऊनच्या बातम्या येत आहेत. गेले सुमारे दोन महिने लॉकडाऊन सदृश्य स्थिती आहे. मात्र कोरोना प्रसार मंदावत नाही. तसेच मृत्यू संख्याही लक्षणीय आहे. मृत्यू संदर्भातील माहिती हा संशयास्पद विषय ठरत आहे. मृत्यूची संख्या दर्शक माहिती संदिग्ध आहे. वाढत्या मृत्यूची संख्या हे ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचे फलित आहे. जिल्हा रुग्णालय, त्याची व्यवस्था, आरोग्य सुविधांची पर्याप्तता या सर्वांबाबत सत्ताधारी गंभीर नाहीत. सर्व लोकप्रतिनिधी सत्ताधारी महाआघाडीचे आहेत. मात्र या लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून निर्णय सुरू आहेत. पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्याचे पालकत्व आणि मिळणारी सापत्न वागणूक ही लपून राहिलेली नाही. ‘हम करे सो कायदा’, कमालीच्या अनुनयाचे राजकारण, आपले कार्यकर्ते, आपले समर्थक यांना लॉकडाऊनचा आधार घेऊन विशेष सवलती असले प्रकार रत्नागिरीत सुरू आहेत.
प्रशासनावर प्रचंड दबाव टाकून निर्णय सतत बदलते ठेवत आपल्या भोवती प्रशासन पिंगा घालत आहे हे पाहण्यात सत्ताधीश मश्गुल दिसतात. जनतेच्या अडचणी समजून घेण्याऐवजी संवेदनशीलता हरवलेले सत्ताधीश मनमानी निर्णय करत आहेत. महाराष्ट्र परत सुरु होत असताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग कडक लॉकडाऊनकडे जात आहे. हे अपयश सत्ताधीशांच आहे. कोणतेही धोरण स्पष्ट कार्यक्रम आणि त्यांची अंमलबजावणी यामध्ये प्रचंड गोंधळ आणि विसंगती सतत अनुभवायला मिळत आहे. ग्रामकृतीदलांना पूर्णत्वाने कार्यरत करण्यात आलेलं अपयश, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये नसलेला ताळमेळ, त्यातून उद्भवणारे गोंधळाचे प्रसंग जनतेच्या जीवाशी खेळ करत आहेत.
प्रशासनाला काम करू द्यायचं नाही. आपल्या भोवती प्रशासनाने पिंगा घालावा या वृत्तीचे प्रतिक म्हणजे रत्नागिरीतील स्थिती आहे.
आरोग्य व्यवस्था सुधार, अतिरिक्त आरोग्य सुविधा उपलब्ध करण, रोग प्रसार रोखण्यासाठी विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करणे, याच बरोबर सामाजिक संस्था, राजकीय संघटना, युवक मंडळे या सर्वांना व्यवस्थेमध्ये सहभागी करून घेतल्यास अधिक प्रभावी पद्धतीने नियंत्रण ठेवता येईल. मात्र सत्ताधाऱ्यांना सर्वसमावेशकता नको आहे. लॉकडाऊनच्या पडद्यामागे अन्य गोष्टी उरकून घ्यायच्या आहेत. आपल्या अपयशावर पडदा घालण्यासाठी जनतेला वेठीस धरणारे लॉकडाऊनचे हत्यार दिशाहीन पद्धतीने वापरले जात आहे. या ताळमेळ नसलेल्या बेपर्वा यंत्रणेचा आणि मनमानी करणाऱ्या सत्ताधीशांचा भा.ज.पा. रत्नागिरी धिक्कार करत असून आता संयमाची परिसीमा झाली आहे. आता या व्यवस्थेला रस्त्यावर उतरून जाब विचारू असा परखड इशारा ॲड.दीपक पटवर्धन, अध्यक्ष भा.ज.पा. रत्नागिरी दक्षिण यांनी दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button