विधानपरिषदेची धुरा राम शिंदेंकडे, सभापतिपदी निवडीबाबत आज अधिकृत घोषणा!
नागपूर : भाजप नेते प्रा. राम शिंदे यांनी आज विधानपरिषद सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. उद्या गुरुवारी (ता.१९) सभापतींची निवड होणार आहे. सभापतिपदासाठी एकमेव अर्ज आलेला असल्याने शिंदे यांची निवड निश्चित मानली जाते.
शिंदे यांच्या निवडीमुळे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सर्वोच्च पीठासीन अधिकारी हे पद भाजपकडे येईल.या हिवाळी अधिवेशनातच राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७ जुलै २०२२ पासून विधानपरिषदेचे सभापतिपद रिक्त आहे. आता या पदासाठी निवडणूक होत आहे. सध्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आहेत, त्यांची सभापतीपदी निवड होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता.
सभापतिपदासाठी शिंदे यांचे नाव जाहीर करून भाजपने शिवसेनेला धक्का दिल्याचे मानले जाते. शिंदे हे सभापतिपदाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.विधानपरिषदेत ७८ सदस्यांपैकी भाजपचे १९ , कॉंग्रेस ७, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ७, शिवसेना ६, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी पाच आणि तीन अपक्ष सदस्यांचा समावेश आहे.
शिंदे यांच्या अनुपस्थितीची चर्चा शिवसेनेला विधानपरिषदेचे सभापतिपद मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती.उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना बढती मिळेल असे बोलले जात होते. मात्र, भाजपने खेळी खेळत एकनाथ शिंदे यांचा दावा फेटाळून लावला. राम शिंदे यांना उमेदवारी दिल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्ज दाखल करताना अनुपस्थित राहिल्याची चर्चा रंगली होती.