सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ असलेल्या आचरे गावची गावपळवण सुरू.
निनादणाऱ्या चौघड्याचा आवाज भेदत तोफेचा आवाज झाला. गावकऱ्यांना गाव सोडण्याचा इशारा झाला. बारापाच मानकऱ्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार पहिला दिंडी दरवाजा आतून बंद केला.मंदिराच्या पुढील दरवाजालाही कुलूप ठोकले. नौबत दणाणत होती आणि आचरे ग्रामस्थ आपली घरेदारे बंद करून गुरेढोरे, कोंबडी, कुत्र्यांसह आपल्या नियोजित स्थळी वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. गुरेढोरही जणू गावपळणीच्या ओढीने मालकासोबत वेशीबाहेर जाण्यासाठी हुंदडत निघाली होती. काहींनी होडीचा तर काहींनी गाड्यांमध्ये सामान भरत वेशीबाहेर जाण्याची वाट धरली होती. अवघ्या काही क्षणातच संपूर्ण आचरा गाव निर्मनुष्य झाला आणि गावात उरली फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ असलेलं हे आचरे गाव. या आचरे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वरावर सर्व घरादाराची जबाबदारी सोपवत ग्रामस्थांनी वेशीबाहेर रानावनात आपले संसार थाटले आहेत. आता तीन दिवस आणि तीन रात्री केवळ गजबजाट असणार आहे तो वेशीबाहेर उभारलेल्या झोपड्यांमध्ये. मोबाईल युगात हरवलेले संवाद आता पुन्हा जुळणार आहेत. सोमवारी दुपारपासून आचरा गावपळणीला सुरुवात झाली असून चौथ्या दिवशी म्हणजे बुधवारी रामेश्वराचा कौलप्रसाद घेऊन गाव भरणार आहे. कौल न झाल्यास एक दिवस वाढू शकतो, असे ग्रामस्थांकडून सांगितलं जात आहे.शहरीकरणाचा साज असलेला आणि सुमारे आठ हजाराच्या आसपास लोकवस्ती असलेले बारा वाड्या आणि आठ महसूली गाव असलेले आचरा गाव काल दुपारनंतर सुरू झालेल्या गावपळणीसाठी वेशीबाहेर विसावले आहे. रविवारपासूनच लांब प्रवासास जाणाऱ्या आचरावासियांनी गाव सोडण्यास सुरुवात केली होती. आज गावपळणी दिवशी सकाळपासूनच आचरा तिठ्यावर गाडीने जाणाऱ्यांची लगबग वाढली होती. जो-तो पळून जाण्यासाठी आतुरला होता.आचऱ्यातील बारा वाड्यांतील ग्रामस्थांनी ज्या गावची वेस जवळची तिकडे वस्ती केली आहे. गावपळणीच्या अगोदर दोन दिवसापासूनच ग्रामस्थांनी गुराढोरांना आवश्यक गवत आदी गोष्टी नियोजित निवासस्थानी नेऊन ठेवण्यास सुरुवात केली होती. पारवाडी ग्रामस्थांनी पारवाडी खाडी किनारी झोपड्या उभारुन वस्ती केली आहे. वरचीवाडी भागातील काहींनी भगवंतगड रस्त्यालगतच्या माळरानावर राहुट्यात आपले संसार थाटले आहेत. किनारपट्टी भागातील लोकांनी आडबंदर मुणगे भागात, गाउडवाडी, हिर्लेवाडी ग्रामस्थांनी चिंदर-सडेवाडी भागात तीन दिवस, तीन रात्रीसाठी संसार थाटले आहेत. केवळ राहण्यासाठी आसरा एवढाच उद्देश न ठेवता काहींनी कल्पकतेने या राहुट्यांना आकर्षक सजविण्यात आले आहेत