रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील शासकीय विश्रामगृह नव्या लूकमध्ये
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे मंदिरानजिक असलेल्या शासकीय विश्रामगृह इमारतीचे सध्या नव्याने दुरूस्ती व रंगरंगोटीचे काम सुरू झाले आहे. यामुळे या इमारतीला आता नवा साज चढणार आहे. गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरानजिकच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेली शासकीय विश्रामगृह इमारत आहे. या इमारतीला अनेक वर्ष झाल्यानंतर या इमारतीतील काही भाग दुरूस्तीसाठी आला होता. या भागाची दुरूस्ती व रंगरंगोटी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले असून गेल्या अनेक दिवसांपासून कामे सुरू आहेत.समुद्रावरून येणार्या खार्या हवेमुळे अनेक उपकरणे, ग्रील खराब होतात.
यांच्या दुरूस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. या इमारतीमधील दरवाजे, खिडक्या, टॉयलेट, बाथरूम, विद्युत उपकरणे आदींची कामे केली जात आहेत. संपूर्ण इमारतीला बाहेरून रंगरंगोटी करण्यात येत आहे. या शासकीय विश्रामगृह इमारतीमध्ये अनेक मंत्री व विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी येत असतात.
या इमारतीत नव्याने दुरूस्तीची कामे सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासून येणार्या विशेष दर्जाच्या व्यक्तींची अन्यत्र राहण्याची सोय करण्यात येत आहे. दुरूस्ती आणि रंगरंगोटीची कामे पूर्ण झाल्यावर इमारतीला नवा साज चढणार आहे. www.konkantoday.com