चिपळूण शहरातील वाढीव घरपट्टीबाबत अर्ज करणाऱ्या नागरिकांच्या घरांचे परत सर्व्हे केले जाणार.
चिपळूण शहरातील वाढीव घरपट्टीबाबत अर्ज करणाऱ्या नागरिकांच्या घरांचे परत सर्व्हे केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली.चिपळूण पालिकेने आपल्या हद्दीमधील सर्व मिळकतीची पाहणी करून सुधारित वार्षिक कर योग्य मुल्याची यादी तयार केली आहे. शहरात एकूण सुमारे ३२ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यामध्ये साडेचार हजार नवीन मालमत्ताधारक तयार झाले आहेत.
शहरातील सर्व मालमत्ताधारकांचा सर्वे करून सर्व मालमत्ता कागदावर आणले आहेत; मात्र काहींना चुकीच्या पद्धतीने घरपट्टी लादल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या विरोधात आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांची भेट घेऊन फेरसर्वेक्षणाची मागणी केली. त्यासाठी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, शहरप्रमुख शशिकांतमोदी, महिला शहर संघटक वैशाली शिंदे, युवा शहर संघटक पार्थ जागुष्टे, प्रशांत मुळे, सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांची भेट घेतली. या वेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
ज्या नागरिकांना घरपट्टी वाढली, असे म्हणणे असेल त्यांनी २८ डिसेंबर २०२४ पर्यंत पालिकेत अर्ज करावेत. ज्यांचा अर्ज येईल त्यांचा पुन्हा सर्वे केला जाईल मगच घरपट्टी कायम केली जाईल. या वेळेत कोणताही दंड लागणार नाही, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.