गुरे चोरून नेण्यासाठी चोरट्या कडून चक्क इनोव्हा गाडीचा वापर
मंडणगड शहरालगत असणाऱ्या रहदारीच्या ठिकाणी भिंगळोली मध्ये रात्रीच्या वेळेस चार चाकी गाडीतून येऊन बसलेल्या गाईगुरांना भुलीचे इंजेक्शन व खाद्यातून खायला देऊन त्यांची चोरी करण्याच्या घटना उघडकीस आलेली आहे. गुरे चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी चक्क इनोव्हा गाडीचा वापर केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.हि घटना तारीख 6 डिसेंबर 2024 रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भिंगळोली ते धुत्रोली मार्गावर एका दुकानाच्या लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
अधिक माहितीनुसार मंडणगड तालुक्यामधून काही वर्षांपासून फिरते पशुधन गायब होण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे, त्याला या घटनेमुळे दुजोरा मिळाला आहे. सीसीटीव्ही मध्ये दिसून येणाऱ्या चित्रीकरणानुसार, रात्री बाराच्या दरम्यान एक चार चाकी इनोव्हा गाडी या ठिकाणी येऊन थांबते व रस्त्यालगत बसलेल्या गाई गुरांना त्यांचं लक्ष नसताना या गाडीतून उतरलेल्या इसमाने इंजेक्शन मारताना स्पष्ट दिसून येते.
घाबरून ही गाईगुरे जात असताना त्यांना थांबवण्यासाठी दुसरा व्यक्ती आपल्या हातातील पिशवीतून त्या ठिकाणी खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ फेकतो. यानंतर या जनावरांमध्ये एक शितलता आलेली पाहायला मिळते व ही जनावरे त्याच ठिकाणी धुंद अवस्थेत बसलेली दिसून येतात.