
मतमोजणीच्या आदल्या दिवशी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले आणि वांद्र्याच्या काही लोकांनी कोट शिवला होता- उदय सामंत यांची टीका.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या आदल्या दिवशी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले आणि वांद्र्याच्या काही लोकांनी कोट शिवला होता. सगळे रात्री कोट घालून झोपले होते. सकाळी रिझल्ट लागणार, महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि कोट घातलेले सगळेच मुख्यमंत्री होणार अशा स्वप्नात होते, पण महाराष्ट्राच्या जनतेने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने विकास होऊ शकतो, हे सकाळी दहा वाजता दाखवून दिलं आणि सगळ्यांनी घातलेले कोट काढून ठेवले, अशा शब्दात उदय सामंत यांनी निशाणा साधला.
गुरुवारी रात्री मुंबईतील सांताक्रुज येथे आयोजित शिवसेना पक्षप्रवेश आणि जाहीर मेळाव्याप्रसंगी सामंतांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावलं.उदय सामंत पुढे म्हणाले की, यातील काही कोट घातलेले लोक पडले देखील म्हणजे ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, मुख्यमंत्री होण्यासाठी ब्लेझर जॅकेट शिवलेली होती, त्यातली काही लोक पराभूत झाली आणि हे पराभूत होण्याचे कारण काय तर आपल्यासारख्या शिवसैनिकांनी जीव ओतून काम केलं, एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचं पालन केलं. सगळेच निवडणुकीसाठी कामाला लागले आणि म्हणूनच आपला स्ट्राईक रेट हा जवळपास ७० टक्क्यांपर्यंत जाऊ शकला.