
जयगड येथील वायू गळतीच्या पार्श्वभूमीवर आमदार उदय सामंत घटनास्थळी भेट देणार.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदल पोर्टच्या टँकर पार्किंग प्लांटमधील इथील वायूची गळती झाल्यामुळे जयगड शाळेतील 50 ते 60 विद्यार्थ्यांना त्याचा मोठा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते त्यामुळे खळबळ उडाली होती ही घटना काल (१२ डिसेंबर) घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत आज सकाळी जयगड येथे भेट देणार आहेत.काल दुपारी जिंदल पोर्टच्या टँकर पार्किंग प्लांटमधील इथील वायूची गळती झाली. या प्रकारामुळे प्लांटच्या जवळच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मळमळ, पोटदुखीचा त्रास तसेच चक्कर यांसारखी लक्षणे दिसायला लागली. मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी वाटद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. काही मुलांना उपचार करून सोडण्यात आले होते. तर काही मुलं अद्यापही शासकीय रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहेत.दरम्यान या घटनेमुळे पालक वर्ग आक्रमक झाला असून कंपनीचा प्लांट बंद करण्यासाठी मागणी पालकांसह जयगड पंचक्रोशीतून केली जात आहे