शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही,-भास्कर जाधव.
शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी मशिदीबाबत केलेल्या ट्वीटवरून समाजवादी पक्षाचे नेते, आमदार अबू आझमी यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका करत महाविकास आघाडी सोडण्याचा निर्णय जाहीर केला.त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते भास्कर जाधव यांनी आझमी यांना प्रत्त्युत्तर दिले आहे. शिवसेना हिंदुत्त्वाचा मुद्दा सोडणार नसल्याचे भास्कर जाधव यांनी ठणकावून सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीत महा विकास आघाडीने घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षासाठी जागा सोडल्या होत्या. सपाचे अबु आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा आणि रईस शेख हे भिवंडी मतदारसंघातून निवडून आले होते. शनिवारी विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबू आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले. मिलिंद नार्वेकर यांच्या ट्वीटवर अबू आझमींनी आक्षेप घेतला होता.भास्कर जाधव यांनी म्हटले की, हिंदुत्वाचा मुद्दा हा शिवसेनेचा आधीपासून राहिलेला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून शिवसेना बाजूला झालेली नाही.
उलट हिंदुत्वाचा मुद्दा हा इतरांनी चोरला आहे. समाजवादी पक्ष फक्त शिवसेनेच्या हिंदुत्वादाच्या मुद्द्यामुळे बाजूला जात असेल तर मी स्पष्ट सांगतो, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी ठणकावून सांगितले.विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे, यासाठी महाविकास आघाडी एकत्रित मिळून प्रयत्न करेल असेही ठाकरे गटाचे विधानसभा गट नेते भास्कर जाधव यांनी म्हटले.
विरोधी पक्षांसाठी आवश्यक असणारे संख्याबळ विरोधी पक्षाकडे नाही. विरोधी बाकांवर सगळ्यात मोठा पक्ष हा शिवसेना ठाकरे गट असून त्यांच्या 20 जागा निवडून आल्या आहेत. विरोधी पक्षासाठी एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के जागा एका पक्षाला मिळणे आवश्यक आहे.