कोकणात शनिवार, रविवारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली.
कोकणात शनिवार, रविवारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून, दाेन दिवसात तब्बल ४० हजार भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतल्याचे सांगण्यात येत आहे.पर्यटकांची पावले रत्नागिरीकडे वळली आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, शाळा-महाविद्यालयीन सहली जिल्ह्यात दाखल हाेत आहेत. लगतच्या जिल्ह्यातील पर्यटक एक दिवसात परत फिरत आहेत तर काही मुक्कामासाठी येत आहेत.
एसटी, टेम्पो ट्रॅव्हलर, जीप, कार इतकेच नव्हे तर दुचाकीवरूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. विशेषत: समुद्र किनाऱ्यावरील ठिकाणांना पर्यटकांची अधिक पसंती मिळत आहे.रत्नागिरीत दाखल हाेणारे पर्यटक गणपतीपुळे, आरे-वारे, रत्नागिरी, पावस, गणेशगुळे, पूर्णगड, जयगड येथेही भेटी देत आहेत. काही पर्यटक जयगड येथून गुहागर गाठत आहेत. तर, काही पूर्णगड करून राजापूर मार्गे सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूरकडे जात आहेत.