रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यात पाणी टंचाईची भीती….भूजल पातळी खालावली…….
रत्नागिरी ०७ :- जिल्ह्यातील चिपळूण गुहागर दापोली आणि मंडळ या चार तालुक्यातील भूजल पातळी खालावली असून उर्वरित पाच तालुक्यात मात्र भूजल पातळीत वाढ झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दर तीन महिन्याला हे सर्वेक्षण होते. त्यासाठी जिल्ह्यातील ६३ विहिरी निश्चित केल्या आहेत. त्यांची पाणीपातळी मोजून त्यावर हा अंदाज बांधला जातो.
जिल्ह्यातील दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिमी पावसाची नोंद होते. त्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी वाढणार, अशी सर्वांची धारणा असते; परंतु अतिवृष्टीचा तसा भूजलपातळीवर थेट परिणाम होत नाही. त्यासाठी रेन वाॅटर हार्वेस्टिंग किंवा पाणी अडवा पाणी जिरवा हे अभियान राबवणे आवश्यक आहे. तरच भूजल पातळीत वाढ होते. गेल्या पाच वर्षांतील सप्टेंबरमधील सरासरी पाणीपातळी ३.०१ मीटर होती. यामध्ये सर्वांत कमी मंडणड तालुक्याची ०.९७ मीटर पाणीपातळी होती तर सर्वांत जास्त लांजा तालुक्याची ५.६२ मी. एवढी पाणीपातळी होती. त्यानंतर उर्वरित तालुक्याची या दरम्यान पाणीपातळी होती; परंतु सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये २.९४ मी. एवढी आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ही पातळी ०.०७ मीटर एवढी भूजल पातळीत वाढ झाली आहे.
मात्र जिल्ह्यातील मंडणगड ०.०५ मी., दापोली ०.०७ मी., गुहागर ०.६७ मी., चिपळूण ०.१० मी. या चार तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटली आहे. उर्वरित खेड तालुक्यात ०.११ मी., संगमेश्वर ०.२७ मी., रत्नागिरी ०.४७ मी., लांजा ०.३९ मी., राजापूर ०.३३ मीटरने भूजलपातळी वाढली आहे.