काय ते एक ठरवा! उपमुख्यमंत्री व्हा नाहीतर…; शिंदेंसमोर दिल्ली बैठकीत भाजपाने ठेवल्या ‘या’ 2 Offers

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी गुरुवारी रात्री दिल्लीत भेट घेतली. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील तिढा सोडवण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी गुरुवारी रात्री भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शिंदेंनी तसेच अजित पवारांनी सत्तेत आपल्याला कसा वाटा अपेक्षित आहे याबद्दलची भूमिका या नेत्यांसमोर ठेवली.

राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानेही या दोन्ही मित्र पक्षांना सत्तेतील वाटेकरी म्हणून काय काय देऊ शकतो याची माहिती दिली. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंना भाजपाने दोन ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या बैठकीमध्ये भाजपाने काही मुद्दे शिंदे आणि अजित पवारांना अगदी स्पष्टपणे सांगितल्याचीही माहिती समोर येत आहे.

महायुतीमधील घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि शाह, नड्डा यांची बैठक दीड तास चालली. या बैठकीमध्ये भाजपाने शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असं सांगितलं. बैठकीत दोन्ही मित्रपक्ष म्हणजेच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मंत्रिमंडळासंदर्भात आपले प्रस्ताव केंद्रीय नेत्यांसमोर ठेवला. दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपाने दोन ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर शिवसेनेची भूमिका मांडताना 12 मंत्रिपदांची मागणी केली. विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली. गृहमंत्रिपदाबरोबरच नगरविकास आणि इतर महत्वाची खाती शिंदेंनी मागितली. तसेच पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी विनंती शिंदेंनी अमित शाहांकडे केली.

शिंदेंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर भाजपाने शिंदेंना त्यांच्यासाठी दोन ऑफर दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर देताना पहिला पर्याय उपमुख्यमंत्री होण्याचा देण्यात आला आहे. तर दुसरा पर्याय हा केंद्रामध्ये मोठं कॅबिनेट पद स्वीकारावं असं भाजपाकडून ऑफर देताना सांगण्यात आलं आहे.

या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी महायुती म्हणून शिवसेना भाजपासोबत असल्याचं शिंदेचा अमित शहांना आवर्जून सांगितलं. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठक सकारात्मक झाल्याची माहिती शिंदेंनी दिली. तसेच मुंबईमध्ये महायुतीची अजून एक बैठक होणार असल्याचंही सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button