महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठाच चेहरा हवा?, दिल्लीत खलबतं; शिंदेंचीच वर्णी लागणार? राजकीय हालचाली वाढल्या!
मुंबई : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार यावरून सत्ता स्थापनेचं घोडं अडलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असल्याची चर्चा असतानाच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मराठा चेहरा हवा असून यासाठी ते सकारात्मक आहेत. अशावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच होतील अशी चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळाला.महायुतीला मराठा समाजाने दिलेले भरघोस मतदान हे निर्णायक ठरले. अशावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा समाजाचाच व्हावा असे दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वात चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो मोठ्या शिताफीने हाताळला. तसेच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून मराठा समाजाने भरघोस मतदान केले. या निवडणूकीत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार निवडून आले. याचे श्रेय एकनाथ शिंदे यांनाच जाते अशाही चर्चा सुरु आहेत.
राज्यात सर्वाधिक लोकप्रिय मराठा नेता म्हणून एकनाथ शिंदेंचे नाव आघाडीवर आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील निर्णयही लोकप्रिय ठरले. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती मिळतेय.