
36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन ‘मी नियमांचे पालन करेन आणि इतरानांही करायला लावेन’ शपथ घ्या – जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 8 :- परदेशात गेल्यानंतर आपण तेथील नियमांचे पालन करतो. मानवी जीवन अत्यंत महत्वाचे आहे. प्रामाणिकपणे वाहतुकीचे नियम पाळल्यास रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल. आपल्या देशातील नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. त्यासाठी मानसिकता बदलायला हवी. ‘मी नियमांचे पालन करेन आणि इतरानांही करायला लावेन’, अशी शपथ सर्वांनी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.
36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन आज झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव तथा कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, वाहनाच्या वेगापेक्षा मानवी जीवनाची सुरक्षा महत्त्वाची आहे. अपघातात मृत्यू झालेल्या परिवाराची अवस्था समजून घ्या. रस्ते अपघाताती मृत्यूचे प्रमाण कमी व्हायला हवे. त्यासाठी सर्वांनीच मानसिकता बदलणे आवश्यक आहे. मी नियमांचे पालन करेन आणि इतरानांही करायला लावेन, अशी शपथ सर्वांनी घ्यावी.
अपर पोलीस अधिक्षक श्रीमती गायकवाड म्हणाल्या, रस्ता सुरक्षा अभियानाची गरज का आहे याचे आत्मचिंतन करायची वेळ आली आहे. केवळ अभियानापुरते नियमांचे पालन व जनजागृती नको तर ते दैनंदिन जीवनात पालन करायला हवे. जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी स्वत:पासून सुरुवात करा आणि वाहतुकीचे नियम पाळा. किमान इतर पाच जणांना पाळायला लावणार, अशी शपथ घ्या.
स्वागत प्रास्ताविकामध्ये उप प्रादेशिक अधिकारी श्री. करपे म्हणाले, गतवर्षी 393 अपघात झाले त्यामध्ये 123 जणांचा मृत्यू झाला आहे. स्वयंशिस्तीत नियमांचे पालन करुन रस्ते अपघातात जाणारे निष्पाप जीव वाचवायला हवेत. ही जबाबदारी सर्वांची आहे.
सुजाण नागरिक म्हणून नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे सांगून श्री. बोरसे म्हणाले अपघातांची, अपघातामधील मृत्यूची संख्या वाढलेली आहे ही विचार करायला लावणारी बाब आहे. आपल्याला तसेच आपल्यामुळे इतरांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. कार्यक्रमाची सुरुवातीला दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी रा.भा.शिर्के प्रशाला, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज इंग्रजी माध्यमिक शाळा, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि नवनिर्माण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करुन जनजागृती केली.
उत्कृष्ट प्रशिक्षण देणाऱ्या मोटर ट्रेनिंग स्कूल, विना अपघात सेवा बजाविणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. ताम्हणकर यांनी सर्वांचे आभार मानले. पत्रकार जान्हवी पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, सेवाभावी संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.