वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनच्या परिसरात लागलेली आग आटोक्यात
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनच्या परिसरात लागलेली आग आटोक्यात आल्यानंतर आता बीकेसी मेट्रो पूर्ववत झाली आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास बीकेसी मेट्रोच्या काम सुरू असलेल्या परिसरात ही आग लागली होती.त्यानंतर मेट्रो काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. आता पुन्हा दुपारी 2.45 मिनिटांनी ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे.
मुंबई मेट्रोने यासबंधित एक निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यामध्ये म्हटलंय की, “मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MMRC) कडून कळविण्यात येते की, आज, 15 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी अंदाजे 1.00 वाजता बीकेसी मेट्रो स्थानकाच्या अद्याप कार्यान्वित नसलेल्या A4 प्रवेश/निकास द्वारा बाहेर आग लागली. या प्रवेश द्वारा जवळ सध्या कामे सुरू असून हे सध्या प्रवाशांसाठी खुले करण्यात आलेले नाही. या आगीमुळे काही भागात धूर पसरला. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बीकेसी स्थानकावरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली होती.