मतदानपूर्व आणि मतदान दिवशीच्या वृत्तपत्रातील जाहिरातींना ‘एमसीएमसी’चे प्रमाणिकरण बंधनकारक
रत्नागिरी, दि.14: – कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या २० नोव्हेंबर २०२४ मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रिंट माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करु नये. भारत निवडणूक आयोगाच्या या निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे आदेश राज्याचे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये. ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खिळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत याबाबत दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या २० नोव्हेंबर २०२४ मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रिंट माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना सदर कालावधीत प्रिंट माध्यमांमध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, अर्जदारांनी जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी एमसीएमसी समितीकडे अर्ज करावा, अशा सूचनाही निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.