
जिल्ह्यातील तीन हजाराहून गुंतवणूकदारांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक करणार्या मातृभीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी ः सहा वर्षात दुप्पट रक्कम अशी आमिषे दाखवून सामान्य लोकांची कोट्यावधीची लुट करणार्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांवर चिपळुणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कंपनीत जिल्हाभरातील तीन हजाराहून अधिक जणांनी गुंतवणूक केली असून सुमारे अडीच कोटीहून अधिक रकमेची लूट केली असल्याची माहती पुढे येत आहे. या प्रकरणी चिपळूण शहरातील जुन्या बस स्थानकानजिकच्या कार्यालयाला येथील पोलिसांनी सील केले आहे.
मातृभूमी ग्रुफ ऑफ कंपनीचे संचालक प्रदीप गर्ग (रा. मीरारोड, पूर्व ठाणे), संदेश हेमंत विश्वास (रा. मीरारोड, ठाणे), मिलिंद अनंत जाधव (पाचपाखाडी, ठाणे), विनोद भाई पटेल (नानापोंडा, लुहार, ता. कापडा, जि. बलसाड, गुजरात) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अरविंद सदानंद मोरे (रा. सिद्धी विनायक, जेलरोड, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली असून सुमारे ७ लाख ६ हजार ७८५ रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.