बोटावरची शाई दाखवा आणि वेगवेगळ्या सवलती मिळवा,
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध खाजगी संस्थांचा पुढाकार!
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आणि जनजागृती करण्यात येत आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी अनेक संस्था, संघटना, व्यावसायिक आस्थापना, समूहांनी पुढाकार घेतला आहे. मतदान केल्यानंतर बोटावरची शाई दाखवा आणि वेगवेगळ्या सवलती मिळवा, अशा आशयाच्या थेट योजना संबंधित संस्था आणि आस्थापनांनी सुरू केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून येत्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होत आहे. नागरिकांना मतदानासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी सार्वजनिक सुटी जाहीर झाली आहे. तसेच, शनिवार, रविवार या साप्ताहिक सुटीला सलग जोडून पर्यटनासाठी जाण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून मतदानासाठी बुधवार हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जात आहेत. मतदान करण्याबाबत नामवंत सिनेकलाकार, प्रतिष्ठीत नागरिक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडूदेखील जनतेला सातत्याने आवाहन करीत आहेत.
पूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कमी होते. ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाढावे, यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली निरनिराळे प्रयत्न करण्यात आले आहेत. दरम्यान, मतदान जनजागृती उपक्रमांमध्ये विविध व्यावसायिक संघटना, संस्था, समूहांनी हातभार लावत थेट सवलती जाहीर केल्या आहेत. मतदान केल्यानंतर आपल्या बोटावरील शाई दाखवा आणि २०, २१, २२ नोव्हेंबर या दिवसांमध्ये १० ते १५ टक्के सवलत प्राप्त करा, अशा आशयाच्या सवलती त्यांनी जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र रिटेलर्स असोसिएशन, उपाहारगृह व्यावसायिकांची संघटना असलेली ‘आहार’ संघटना, चित्रपटगृह व्यावसायिकांची संघटना यांच्यासह इतरही अनेक खासगी उद्योगसमूह, व्यावसायिक आस्थापना यांचा त्यात समावेश आहे.
स्थानिक परिसरांमध्येदेखील लहानसहान दुकाने, आस्थापना, व्यावसायिक यांनीदेखील अशा स्वरूपाच्या सवलती घोषित केल्या आहेत.अधिकाधिक मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या मतदानामध्ये मतदारांनी विक्रमी संख्येने सहभाग नोंदवावा, साप्ताहिक सुट्या व मतदानाची सुटी यांना जोडून सलग सुट्या घेऊन पर्यटनासाठी न जाता मतदानाच्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.