दापोलीत जमीन उत्खननावेळी वनक्षेत्रातील झाडांचे नुकसान , जेसीबीसह सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
दापोली तालुक्यातील ताडील येथे जमीन उत्खननावेळी राखीव वनक्षेत्रातील झाडांचे नुकसान करणाऱ्या जेसीबीचालकासह जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जेसीबीसह सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहेयाबाबत वन विभागाकडून पत्रक प्रसिद्धीला देण्यात आले आहे. त्यानुसार दापोली तालुक्यातील ताडील येथे जेसीबीच्या साहाय्याने जमिनीत उत्खनन सुरू होते. यावेळी राखीव वनक्षेत्रातील ऐन, पांगारा ही झाडे धक्का पोहोचून पाच झाडांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी जेसीबीचालक हिरालाल रामेश्वर मेहता (रा. नवानगर, ता. दापोली) तसेच जमीनमालक अन्वर महम्मद सुर्वे (रा. मुंबई) यांच्यावर भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६ नुसार वनपाल आर. डी. खोत यांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच जेसीबीसह सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे.ही कारवाई परिक्षेत्र वन अधिकारी पी. जी. पाटील, वनपाल आर. डी. खोत, वनरक्षक शुभांगी भिलारे, सूरज जगताप, शुभांगी गुरव यांच्या पथकाने केली. सरकारी वनातील माती, मुरूम, औषधी वनस्पती, झाडांची चोरी, अतिक्रमण, प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित वनविभागाला कळवावे आणि राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करावे, असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड यांनी केले आहे.