दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल!
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोकणवासियांचा मुंबई – रत्नागिरीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दादर – रत्नागिरी पॅसेंजर सेवा चालवण्यात येत होती. मात्र, करोनाकाळात ही सेवा बंद करून, सप्टेंबर २०२१ पासून दादरऐवजी दिव्यावरून रत्नागिरीपर्यंत पॅसेंजर चालवण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून दादरवरून थेट रत्नागिरीला जाणारी पॅसेंजर सेवा बंद झाल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.
कोकणवासियांसाठी १९९६-९७ पासून लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रत्नागिरी पॅसेंजर गाडी सुरू केली. मात्र, मुंबई शहर आणि पश्चिम, पूर्व उपनगरातील कोकणवासियांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी दादर स्थानक जवळचे असल्याने, ही पॅसेंजर दादरवरून धावू लागली. सर्वच स्थानकांवर थांबणारी ही गाडी लोकप्रिय झाली आणि महत्त्वाची ठरली. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील सर्वच लहान-मोठ्या गावांतून सकाळी लवकर निघून मुंबई शहरात पोहोचून दुपारपर्यंत कामे आवरून त्याच दिवशी गावी परत जाण्यासाठी सर्वांनाच या गाडीचा मोठा आधार होता. परंतु, २०२० च्या शून्य आधारित वेळापत्रकात वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने ही गाडी दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सप्टेंबर २०२१ मध्ये गाडी क्रमांक ५०१०३ / ५०१०४ रत्नागिरी दादर – रत्नागिरी पॅसेंजर ही रत्नागिरी – दिवा – रत्नागिरी पॅसेंजरमध्ये रूपांतरित करण्यात आली. आता ही गाडी दिवा स्थानकातून सुटत असल्याने दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पश्चिम उपनगरे, वसई, विरार, नालासोपारा, गुजरात येथे स्थायिक असलेल्या कोकणवासीयांना दिवा येथे जाणे-येणे त्रासदायक झाले आहे. तसेच, दिव्याला प्रवास करण्यासाठी रेल्वेशिवाय इतर सोयीस्कर पर्याय नसल्याने लांबून येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.वक्तशीरपणा सुधारण्यासाठी केलेल्या बदलाचा प्रवाशांना त्रास तर झालाच, परंतु गाडीच्या वक्तशीरपणातही काहीही फरक पडलेला नाही.
मध्य रेल्वेवरील दिवा – रत्नागिरी पॅसेंजरचे दातिवली, निळजे, तळोजे, नावडे रोड, कळंबोली, सोमाटणे, रसायनी, हमरापूर, निडी या नऊ स्थानकांतील थांबे रद्द केले. थांबे कमी करूनही या गाडीला पूर्वीचाच प्रवास वेळ दिलेला असून ही गाडी कधीच दिव्याला निर्धारित वेळेत पोहोचत नाही. तसेच, वारंवार लोकप्रतिनिधी व प्रवाशांनी ही गाडी पुन्हा दादरवरून सोडण्याची मागणी केल्यावर मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देणारे रेल्वे प्रशासन त्याच वेळेत त्याच दादर स्थानकातून गोरखपूर व बलियासाठी ०१०२५, ०१०२६, ०१०२७, ०१०२८ क्रमांकाच्या विशेष रेल्वे चालवत आहे, असे कोकण विकास समितीकडून सांगण्यात आले.कोकण रेल्वे मार्गावर जाण्यासाठी जनशताब्दी, मांडवी, कोकणकन्या, तुतारी, वंदे भारत, तेजस किंवा इतर कितीही गाड्या असल्या तरी त्यांची तुलना रत्नागिरी पॅसेंजर व सावंतवाडी दिवा एक्स्प्रेस गाड्यांशी होऊ शकत नाही.
कारण या दोन गाड्या काही मोजके अपवाद वगळता सर्व स्थानकावर थांबतात. तर, या गाड्यांमध्ये संपूर्ण अनारक्षित किंवा ७० टक्के अनारक्षित डब्यांचा समावेश आहे. तसेच दिवा येथे फलाटांची लांबी कमी असल्यामुळे येथील गाड्यांना १६ ते १७ डबेच जोडता येतात. परिणामी, गर्दीचे विभाजन करणे कठीण होते. त्यामुळे दिवा – रत्नागिरी, दिवा – सावंतवाडी या दोन्ही रेल्वेगाड्या दादर किंवा सीएसएमटीपर्यंत चालवण्यात याव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी केली आहे.