आयएमए महाराष्ट्र स्टेट अवॉर्डने डॉ. तोरल शिंदे यांचा ठाणे येथे सन्मान.
रत्नागिरी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळत आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या डॉ. तोरल निलेश शिंदे यांना आयएमए महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड 2023 -24 देऊन नुकताच सन्मान करण्यात आला.रत्नागिरीतील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. तोरल निलेश शिंदे यांनी सन 2023 – 24 या कालावधीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष पद भूषविले. या कालावधीमध्ये त्यांनी आरोग्य क्षेत्रात सामाजिक स्तरावर विविध उपक्रम राबविले. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांसमवेतच परिचारिका, कर्मचारी आणि या क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येकाच्या आरोग्याशी आणि सर्वांगीण विकासाशी निगडित असलेले विविध उपक्रम राबवले होते. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुकही झालं होतं आणि याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्यांच्या याच कामाची दखल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागाने घेतली आणि ठाणे येथे झालेल्या मास्टकॉन परिषदेमध्ये त्यांना आयएमए महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड 2023 -24 देऊन गौरवण्यात आले.
यावेळी आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे आणि सचिव डॉ. सौरभ संजनवाला उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते डॉ. तोरल शिंदे यांना हा सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. तोरल यांनी या सर्व यशाचे श्रेय आयएमए च्या २०२३-२४ च्या टीमला तसेच संपूर्ण आयएमए रत्नागिरी परीवाराला दिले. याबद्दल डॉ. तोरल शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.