
अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे -खासदार नारायण राणे.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजानचा महिना असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती.यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हटलं.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे नितेश राणे यांना हा टोला लगावला होता. आता अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.अजित पवार म्हणाले, भारत विविधतेत एकतेचे प्रतीक आहे.
आपण कोणत्याही फुटीरतावादी शक्तींच्या जाळ्यात अडकू नये. आपण नुकतीच होळी साजरी केली आहे, गुढी पाडवा आणि ईद येत आहेत. हे सर्व सण आपल्याला एकत्र राहायला शिकवतात. आपण सर्वांनी ते एकत्र साजरे केले पाहिजे कारण एकता ही आपली खरी ताकद आहे. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की तुमचा भाऊ अजित पवार तुमच्यासोबत आहेत. जो कोणी आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींकडे डोळे दाखवेन, जर कोणी दोन गटांमध्ये भांडणे निर्माण करण्याचा आणि कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला, तो कोणीही असो-त्याला सोडले जाणार नाही, त्याला माफ केले जाणार नाही.अजित पवार यांच्या मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही या वक्तव्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे असं वाटतंय .