स्वर्गीय दत्तप्रसाद गोडसे यांना ज्येष्ठ नागरिकांची भावपूर्ण श्रद्धांजली
रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरीच्या बोर्डिंग रोडवरील रहिवासी वधू वर सूचक मंडळाचे संचालक श्री दत्तप्रसाद वासुदेव गोडसे यांचे दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मारुती मंदिर येथे दुचाकीच्या धडकेत अपघाती निधन झाले. त्यांना दिनांक 28 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहरातील जेष्ठ नागरिकांच्या वतीने शोकसभा घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वर्गीय गोडसे शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाल्यानंतर एलआयसी एजंट म्हणून कार्यरत होते. तसेच ते गरजूंसाठी नाममात्र शुल्क घेऊन वधू वर सूचक मंडळ चालवीत असत. अत्यंत शांत आणि नम्र स्वभावाचे म्हणून ते सर्वांना परिचित होते. येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक संघात होणाऱ्या कार्यक्रमाचे उपस्थित राहून सहकार्य करीत असत त्यांना ज्येष्ठ नागरिक संयोजक श्री अण्णा लिमये यांच्यासहित समाज भूषण श्री सुरेंद्र घुडे, तसेच सर्वश्री संजीव सरखोत, विठोबा चंदरकर, रणधीर शेटे, अरविंद वांदरकर, प्रताप शिंदे, संजय शेटे इत्यादी ज्येष्ठ नागरिकांनी गोडसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.