कृत्रिम बुद्धिमत्ता हाच भविष्यातील पर्याय : डॉ. भालचंद्र मुणगेकर “नवनिर्माण गौरव पुरस्कार २०२४”चे थाटात वितरण
रत्नागिरी : रोजगार हवा असेल तर नुसत्या पदव्यांवर समाधान मानून चालणार नाही. पुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हाच पर्याय असेल. विज्ञान इतके पुढे जात आहे की त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येणार नाही. क्रांती तुम्ही रोखू शकत नाही. स्वतःचे छोटे छोटे उद्योग सुरू करायला लागतील, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या मिळणार नाही. हे एक नवीन आव्हान आहे आणि ते स्वीकारले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु, माजी खासदार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.नाट्य, अभिनय क्षेत्रात आज असणार्या प्रचंड संधी कोकणातील उपजत कलाकार असणार्या मुलांना मिळण्यासाठी नवनिर्माणने सेंट झेवीअर्स सारखे मनोरंजन क्षेत्रातील कोर्सेस सुरु करावेत त्यासाठी सर्व ते सहकार्य आपण करु असे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांनी यावेळी सांगितले.राज्यस्तरीय नवनिर्माण गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात नवनिर्माण संस्थेच्या वतीने विज्ञान, शिक्षण, सामाजिक, साहित्य या चार क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यातील सामाजिक क्षेत्रात उपेक्षित घटकासाठी काम करणार्या ‘मानवलोक’ संस्थेचे अनिकेत लोहिया (आंबेजोगाई, जि. बीड) आणि विज्ञान क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या विज्ञान प्रसारक शिवाजी माने (जढाळा, लातूर) यांना ‘नवनिर्माण गौरव पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. २५००० रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सन्मानपत्राचे लेखन आणि वाचन प्रा. प्रकाश नाईक (कोल्हापूर) यांनी केले. डॉ. मुणगेकर म्हणाले, माझ्या कुलगुरू पदाच्या काळात मी जी काही चांगले कामे केली आहेत त्यातले एक म्हणजे ‘नवनिर्माण’ला परवानगी देणे. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी नवनिर्माणने ज्ञानाची कवाडे खुली केली. नवनिर्माण म्हणजे नव्या समाजाच्या निर्माणासाठी धडपड. छात्र भारतीच्या माध्यमातून कुठल्याही राजकीय पक्षाला न जुमानणाऱ्या धडपडणाऱ्या आम्हा युवकांचे एक स्वप्न होते ते म्हणजे नवीन समाजाचा निर्माण करणे. दुसऱ्यासाठी जगायला शिकणे ही भावना मनात निर्माण होणं हे महत्त्वाचे आहे. सामाजिक भावनेतून निर्माण झालेल्या या शिक्षण संस्थेची वाटचाल अभिमानास्पद आहे. त्यात अभिजीत हेगशेट्ये यांची जिद्द, खिशात काही नसतानाही केवळ बहुजनांच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांनी त्यावेळी उचललेले हे पाऊल म्हणजे धाडसचे आहे.यावेळी डॉ. मुणगेकर यांनी स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्यता, संविधान, देशाचे स्वातंत्र्य या विषयांवरही प्रकाश टाकला. आजही स्त्रिला मिळणारे दुय्यम स्थान बघून खंत वाटतं असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविक करताना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. हेगशेट्ये यांनी ‘नवनिर्माण’च्या गेल्या पंचवीस वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. १० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या शिक्षण संस्थेत आज ६ हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्था उपाध्यक्ष डॉ. परकार यांनी हेगशेट्ये यांच्या चिकाटीला दाद देत कौतुक केले. डॉ. ढवळ यांनी रत्नागिरीत फिजियोथेरेपीचे कॉलेज असण्याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन टेकाळे यांनी केले. आभार शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांनी मानले. याप्रसंगी व्यासपीठावर नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संस्था उपाध्यक्ष डॉ. अलीमिया परकार, राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, राज्याचे अध्यक्ष अर्जून कोकाटे, कै. मोहन खातू यांचे बंधू मृत्युंजय खातू, प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, खजिनदार शरद कदम, परेश पाडगावकर, एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओच्या संचालिका ऋतुजा हेगशेट्ये, संगमेश्वर नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, संगमेश्वर नवनिर्माण कॉलेजच्या प्राचार्य डॉ. संजना चव्हाण, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.