ज्योती मेटेंनी हाती घेतली ‘तुतारी’, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, बीडमधून मिळणार उमेदवारी?
मुंबई: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. उमेदवार, मतदारसंघ चाचपणी देखील पक्षांकडून सुरू आहेत. संभाव्य उमेदवारी मिळणाऱ्या पक्षांत उमेदवार पक्षप्रवेश करताना दिसत आहेत.विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेची जबाबदारी ज्योती मेटे सांभाळत होत्या. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील त्यांची निवड करण्यात आलेली होती. लोकसभेपासून त्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होत्या. आता देखील त्यांनी विधानसभेसाठी चाचपणी सुरू केली होती, मात्र अचानक ज्योती मेटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ज्योती मेटे यांच्या सह सलीम पटेल बाळासाहेब खोसे यांनी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.*बीडमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा?*गेल्या काही दिवसांपूर्वी ज्योती मेटे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी शरद पवार गटासोबत चर्चा केली होती. आता त्यांनी थेट शरद गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना शरद पवार गटाकडून बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.*कोण आहेत ज्योती मेटे?*मराठा आरक्षणाबाबत कायम आग्रही भूमिका घेणारे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत. त्या प्रशासकीय अधिकारी होत्या.*राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची सोशल मिडिया पोस्ट*ज्योती मेटे यांच्या पक्षप्रवेशाची सोशल मिडियावर पोस्ट करत पक्षाने लिहलं आहे. “नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील, आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्यासह सलीम पटेल व बाळासाहेब खोसे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत; पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते श्री. विजयसिंह मोहिते- पाटील, माननीय खासदार श्री. धैर्यशील मोहिते- पाटील, व माननीय आमदार श्री. शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.”