
१०० दिवसात, आका, खोका हेच जनतेने बघितले !
नागपूर :* एकीकडे राज्यात सत्तेत आल्यानंतर 100 दिवस झाले म्हणून महायुती सरकारने रिपोर्ट कार्ड सादर केले. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र सरकारच्या 100 दिवसात जनतेने राज्यात आका, खोका आणि बोका हेच चित्र बघितले असा आरोप माध्यमांशी बोलताना केला. महिला व बाल कल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषि खाते सरकारच्या परीक्षेत मेरिटमध्ये आले.मात्र शंभर दिवसात जनतेचा अपेक्षा भंग झाला. बेताल वक्तव्य करणारे मंत्री या काळात दिसले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट करणार असल्याचे जाहीर केले. अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील असेही स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागलीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला जाहीर केला. इतरांना संधी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शंभर दिवसांच्या टार्गेटकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून विविध विभाग आणि मंत्र्यांचा निकाल जाहीर झाला.
सरकार स्थापन झाल्यापासून अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सुरू झाले. त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यांच्या बीड जिल्ह्यातील गुंडगिरी जनतेला बघायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर कृषिमंत्र्यांना तंबीही दिली होती यावर सपकाळ यांनी भर दिला. एकंदरीत आका व खोक्याच्या सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.दरम्यान, यंदा काँग्रेसने संघटना वर्ष जाहीर केले आहे. त्यानुसार पक्षसंघटनेत आवश्यक फेरबदल सुरू करण्यात आले आहेत. संघटन वर्ष असल्याने नक्कीच आवश्यक बदल वर्षभरात होणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.