पुण्यात मोदींचे मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्याचा भाजपला ‘रामराम’
पुणे : संघटनेत जरा डावे-उजवे झाले, की नेत्याला देव मानणारा कार्यकर्ताही पक्षाला ‘रामराम’ करायला मागे-पुढे पाहत नाही. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष सध्या याचाच अनुभव घेत आहे. तीनच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधल्याने चर्चेत आलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विशेष नियोजन केले जात आहे. पुण्यात विधानसभेची उमेदवारी देताना संबधित मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मत विचारात घेतले जाणार आहे, असे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मात्र, यामध्येही विद्यमान आमदारांच्या मर्जीतील पदाधिकारी दबाव टाकत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.मतदारसंघातील आमदार ठरावीक पदाधिकाऱ्यांवर आणि बाहेरच्या कार्यकर्त्यांवर मर्जी दाखवित असल्याचा आरोप करून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी मयूर मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंडे यांनी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवाचा दर्जा देऊन मोदी यांच्या मंदिराची उभारणी केली होती. त्यामुळे हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला होता.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामधे भाजप सोडण्याची कारणेही त्यांनी नमूद केली आहेत. ‘गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे. औंध वॉर्ड अध्यक्षांपासून शिवाजीनगर मतदारसंघाच्या युवा मोर्चा उपाध्यक्षपदापर्यंत पक्ष संघटनेचे काम अत्यंत निष्ठेने केले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये निष्ठावंत वगळून बाहेरील व्यक्तींनाच जास्त महत्त्व दिले जाते आहे. त्यामुळे मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतो आहे,’ असे मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.