मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो आजपासून धावणार!

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर सोमवारपासून हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो गाडी सुटणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.*मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो कनेक्ट ३ ॲप कार्यान्वित केले आहे. या ॲपद्वारे प्रवाशांना आरे ते बीकेसी दरम्यानच्या सर्व स्थानकांची, स्थानकातील सोयीसुविधांची आणि इतर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे ॲप इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा भाषांमध्ये उपलब्ध आहे.जवळचे मेट्रो स्थानक कोणते आहे, तिकीट दर किती, गाड्यांचे वेळापत्रक यांसह अन्य सर्व प्रकारची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या तक्रारी या माध्यमातून जाणून घेतल्या जाणार आहेत. या तक्रारींचे निवारणही ॲपद्वारे केले जाणार आहे. मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी बस, टॅक्सी, रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे का, याचीही माहिती या ॲपद्वारे प्रवाशांना मिळणार आहे. याबरोबरच ‘एमएमआरसीएल’ने क्यूआर कोड स्कॅनिंग तिकीट, ई तिकीट सेवेसह ईव्हीएम मशीनची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.*प्रतिसादाची अपेक्षा*पहिल्या भुयारी मेट्रो प्रवासासाठी मुंबईकर उत्सुक असल्याने सोमवारी बीकेसी आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावर मोठी गर्दी होण्याची शक्यता होत आहे. या मेट्रोला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button