
बिग बॉस मराठी ५’च्या विजेता सूरज चव्हाण.
गेल्या काही दिवसांपासून सगळे मराठी प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहेत, तो क्षण अखेर पार पडला आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड फिनाले सोहळा पार पडला आहे.१०० दिवस चालणारा हा शो यंदा मात्र अवघ्या ७० दिवसांतच संपला. मात्र या ७० दिवसांतही या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. यंदाच्या पर्वाने ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आणि नॉन-फिक्शनच्या शोमध्येही सर्वोच्च टीआरपी आणत बाजी मारली. एकूण १६ जणांच्या एन्ट्रीने सुरुवात झालेला ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अवघ्या सहा जणांवर येऊन ठेपला. एकमेकांना टक्कर आणि चुरशीची लढत देत या सहा जणांनी शोच्या अंतिम सोहळ्यापर्यंत बाजी मारली आहे.अंकिता प्रभू वालावलर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे सहा जण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे अंतिम दावेदार बनले. या सहा जणांनीदेखील एकमेकांना टक्कर देत आपला इथपर्यंतचा पल्ला गाठला. अशातच नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बाजी मारली आणि ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. शोचा होस्ट रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केलं आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे.